दुष्काळाची तीव्रता वाढली; मराठवाड्यातील धरणे आटली

Foto
औरंगाबाद: अपुर्‍या पावसामुळे महाराष्ट्रात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, राज्यातील धरणांमध्ये फक्‍त ७.७ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्‍लक आहे. मराठवाड्यातील विविध लहान-मोठ्या धरणांमध्ये केवळ०.७ टक्के पाणीसाठा उरला आहे. औरंगाबाद, जालना, लातूर, बीडसह मराठवाड्यातील सर्व आठही जिल्ह्यांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे.

मराठवाड्याला दुष्काळ हा नवीन नाही;परंतु यावर्षीचा दुष्काळ भयानक आहे. औरंगाबाद, जालनासह अनेक जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता अधिक आहे. मराठवाड्यासाठी वरदान ठरलेल्या पैठण येथील जायकवाडी धरणासह मांजरा, सिद्धेश्‍वर, माजलगाव, सीना-कोळेगाव, मानार आदी प्रकल्प कोरडे पडले आहेत. जायकवाडीतील जिवंत पाणीसाठा संपल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मृतसाठ्यातून औरंगाबाद, जालना, बीडसह अहमदनगर जिल्ह्यातील काही गावांना व औद्योगिक क्षेत्राला पाणीपुरवठा केला जात आहे. एकीकडे तीव्र पाणीटंचाई भेडसावत असताना दुसरीकडे उष्णताही वाढली आहे. नद्या, नाले, धरणे, तलाव व विहिरींसह सर्व जलस्त्रोत कोरडे पडले असून, पाण्यासाठी लोकांना दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. टंचाईग्रस्त गावांना प्रशासनाकडून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. दिवसेंदिवस टंचाईची दाहकता वाढत असून, मराठवाड्यातील टँकरच्या संख्येने एक हजाराचा आकडा ओलांडला आहे. राज्यातील ४ हजार ९२० गावे आणि १० हजार ५२० वाड्यांवर ६ हजार ४४३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. लहान-मोठ्या धरणातील पाणीसाठा संपत चालल्याने येत्या काळात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेला राज्यातील धरणांमध्ये १८ टक्के तर मराठवाड्यात १४ टक्के पाणीसाठा शिल्‍लक होता. यंदा राज्यातील धरणांमध्ये फक्‍त ७.७ टक्के तर मराठवाड्यातील विविध धरणांमध्ये केवळ ०.७  टक्के पाणीसाठा शिल्‍लक आहे.  अद्याप मान्सून केरळमध्ये दाखल झालेला नाही. ६ जून रोजी मान्सून केरळमध्ये प्रवेश करेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे पाऊस पडेपर्यंत शिल्‍लक पाणीसाठ्यातील पाणी पुरवण्याचे मोठे आव्हान असणार आहे 


Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker